अनोळखी वाटा – भाग ४

आज सकाळी सकाळी मला रुजूकडे जायचं होतं. तिच्या घरी जाणं म्हणजे उलट उत्तर न करता आपलं म्हणणं पटवून देणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी असते.

(रुजूच्या घरी)

बोक्या – ऐक ना, मूड कसा आहे बाबांचा?

रुजू – ठीक आहे, पाठवतील असं वाटतंय, डोन्ट वरी, जास्त काही नाही विचारणार तुला. बरं ऐक, आपल्यासोबत मुलं येतायंत हे मी सांगितलंय आणि आपण महाराष्ट्र फिरायला जातोय. तू सांगितल्याप्रमाणे एखाद – दोन ट्रेक असतील.

(तितक्यात रुजूचे बाबा येतात.)

मी – ” नमस्ते काका ”

(ते हसतात आणि आपल्या खुर्चीवर येऊन बसतात.)

काका – ” काय कसं चाललंय तुझं? ”

मी – ” छान, हैदराबादला असते मी. आता इथे आलेय सुट्टीसाठी. ”

काका – ” आम्ही आमच्या रुजूला कधीच कधीच घरापासून दूर पाठवलं नाही. जे काय करायचं असेल ते इथेच राहून करायचं. ”

मी – ” माझ्या आई – बाबांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांना मी मुलगी आहे, म्हणून माझं टेन्शन कधीच नव्हतं कधी असलंच तर प्रेमापोटी.”

(ओह नो, मी हे काय बोलले. रुजूला आपल्याला न्यायचंय ट्रिपला. एका नजरेने मी तिच्याकडे पाहिलं, तिच्याही चेहऱ्यावर हेच हावभाव होते की मी हे काय बोलतेय? )

काकांनी रागाने एक कटाक्ष माझ्यावर टाकला.

काका – ” रूजू म्हणत होती, तुम्ही सगळे ट्रिपला जाणार आहात म्हणून? ”

मी – “अं हो, आम्ही प्लॅन करतोय. बरेच वर्ष झाले, सगळे एकत्र भेटले नाहीयेत. तेवढंच सगळ्यांचं भेटून होईल एकत्र. ”

काका – ” पुण्यातही भेटताच की तुम्ही? ”

मी – ” हो… पण सगळ्यांचं एकत्र भेटणं नाही होत ना! आणि तितका वेळही एकमेकांसोबत मिळत नाही. म्हणून विचार केला सोबत ट्रिपला जाऊ.”

काका – ” बरं मग कोण कोण आहेत तुमच्या सोबत? ”

मी – ” आम्ही कॉलेजचेच सगळे. विड, फट्टू, नेहा स्वप्न्या. ”

काका – ” विड?? हे कसलं नाव? ”

(रुजू मनात – बोक्या गप्प बस)

मी – ” नाही काका… ते असंच… पेट नेम. ”

(रुजूकडे पाहत, मी – सॉरी)

काका – “अस्सं… कुठे जाणार आहात तुम्ही? ”

मी – ” आम्ही महाराष्ट्रातच जायचा विचार करतोय. पुण्याच्या आसपासच. ”

काका – ” तुम्ही मुली आहात, आपल्या मर्यादा लक्षात ठेवा. आम्ही रुजूला नेहमी सांगत असतो, कोणालाही कोणत्याही कारणाने आपल्याला हात लावू द्यायचा नाही… मुलं काय मस्करीमध्येही, टाळी मारण्याचा उद्देशाने…

(काकांचं प्रवचन पुन्हा सुरु. हे प्रवचन सुरु झालं की रुजूलाच जास्त खजील झाल्यासारखं वाटायचं.)

मी – ” काका मी आहे तिच्यासोबत. तुम्ही काळजी नका करू. ”

काका – ” तुझाही नंबर मला देऊन ठेव. मी रोज फोन करेन.

मी – ” हो नक्कीच. ”

(आता यांच्यासमोर बोलण्यासारखं काहीच उरलं नव्हतं.)

“ओके काका, निघते मग मी. ”

काका – ” बरं चालेल. रुजूला सोडायला येईनच मी, तेव्हा भेटू. ”

(घरातून आम्ही दोघीही बाहेर पडलो.)

मी – ” अजून हे टॉर्चर असतं का घरी? ”

रुजू – ” मग काय यार, वैताग आहे नुसता. ”

मी – ” चल सोड, जाऊ दे. आपण जातोय हे काही कमी आहे का? फुल्ल धमाल करू. ”

रुजू – ” ए बोक्या, तुम्ही शॉपिंगला जाणार आहात ना! मी पण येईन. ”

मी – ” या रविवारीच जातोय. तयार राहा. मी फोन करेन. साधारण पुढच्या गुरुवारी आपण निघू, २ जूनला. ”

रुजू – ” आता एक आठवडा निघणं खरंच कठीण आहे. ”

मी – ” हो, मी पण वाट बघतेय. मी निघतेय आता. ”

……………………………………………………………………………………………………………………………………………………..

“फट्टू, मी बोलतेय. प्लिज चल ना, आता तर खरंच सगळेच तयार झालेयत ट्रिपला यायला. मला माहित नाही तुझी कोणाशी रेस सुरु आहे ज्यासाठी तू एक मिनिटही दवडत नाहीयेस पण खरंच एकदा ऐक आणि चल. काय माहित कदाचित तुलाच तुझं काहीतरी सापडेल. तुझ्यासाठी असलेलं. ” – मी

( एकाच ओघात मी इतकं सगळं बोलून गेले आणि पुढची दोन मिनिट शांतता )

” हो गया तेरा? साँस लेती हैं भी या नही? ” – फट्टू

” मी जे बोलतेय त्याकडे लक्ष दे ना! ” – मी

” अच्छा चल बता, नेहा भी आ रही क्या? और उसके हिल्स का क्या करेगी? ” – फट्टू

” तिला तर पहिल्यांदाच स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलीये, फक्त शूज घ्यायचेयत. ” – मी

” अच्छा है, उसको समझा नहीं तो पागल आएगी ऐसेही मुँह उठाके। चल थोड़ी देर बाद बात करता तुझसे। ” – फट्टू

फट्टू येण्याबद्दल सोडून बाकी सगळं बोलला. कसं समजाऊ याला येण्याबद्दल? चित्र तर हेच होतं की तो येणार नाही, पण तरीही मनातून कुठेतरी हेच वाटत होतं की शेवटच्या क्षणी तरी तो येईल. चला आपली जायची तयारी तर करावीच लागेल.

……………………………………………………………………………………………………………………………………………………..

इतके दिवस फोनवर बोलणं चाललेले आम्ही सगळे एकदा एकत्र भेटलोच. विडला काहीच घ्यायचे नव्हतं, पण त्याला पळवण्याबद्दल आम्हाला प्लँनिंग करायचं होतं. शिवाय ट्रिपला निघण्याची तारीखही सगळ्यांना सांगायची होती.

” बोक्या, कौनसे शूज लू मैं? ” – नेहा

” देखते है कुछ सस्ता सूंदर टिकाऊ। ” – मी

सगळ्यांची सगळी थोड्या – जास्त प्रमाणातली शॉपिंग झाली आणि आम्ही कॅफे कॉफी डे मध्ये बसून बाकी गोष्टी बोलायचं ठरवलं. आता आम्हाला हे परवडण्यासारखं होतं कारण सगळेच कमावते होते. कॉलेजमध्ये असताना यायच्या आधीही ४ -५ वेळा विचार केला जायचा, खिशाला परवडेल की नाही याचा. क्वचितच कधी आलो असेल आम्ही. आज बऱ्याच गप्पा रंगणार होत्या आणि बरंच प्लॅनिंगही होणार होतं.

” स्वप्न्या तू गाडीची सोय करू शकतोस का? ” – मी

” आता गाडी पण माझीच का? मी येतोय ते बास नाहीये का? ” – स्वप्न्या

” किती रडका आहे हा यार… ” – मी

” ए मेरे घर की गाडी पार्किंगसे चुरा के लेके जाए क्या? ” – नेहा

” तुझे पप्पा ना मिलिटरी मध्ये आहेत. आपण मोकळ्या हवेत नाही, हवालात जाऊ. ” – विड

आणि विड स्वतःच हसायला लागला. त्याच्या हसण्याची एक पद्धत होती, हे हे हे ने सुरुवात करून तोच जोरात हसायला लागायचा. कोणाला जोक आवडला नाही ना, तरी त्याचं हसणं बघून सगळ्यांना हसायला यायचं.

” माझे बाबा गाडी द्यायचा प्रश्नच येत नाही. ” – रुजू

” मी तर स्वतःच घरातून पळतोय, गाडी पण पळवली तर मग झालंच. हे हे हे हाहाहाहा… ” – विड

” माझे बाबा आता इथे नाहीयेत, नाहीतर माझीच गाडी घेतली असती ” – मी

” स्वप्न्या प्लिज घे ना गाडी, उगीच गाडीला एक्सट्रा पैसे जातील आपले. ” – रुजू

” अरे यार, तुम्ही मला खरंच मरवणार आहात. एकतर घरच्यांना नक्की कुठे जाणार, कुठे राहणार हे सांगणार नाही. बाप म्हणेल, याच्यापुढे मला तोंड दाखवू नको, नाहीतर मला तुम्हाला म्हणावं लागेल, तोंड दाखवू नका परत. ” – स्वप्न्या

” ठीक आहे, तू समोर आलास की मग तुला पार्श्वभाग दाखवतो. हे हे हे हाहाहाहा. ” – विड

आता तर सगळेच हसायला लागतात.

” ग्रेट गाडीचं तर झालं. बोक्या, फट्टू खरंच येत नाहीये? ” – रुजू

” अरे उसको क्या हुआ? क्यों नहीं आ रहा वो गधा? ” – नेहा

” मी खूप प्रयत्न केला. पण काहीच बोलला नाही. ” – मी

” मी सुद्धा फोन केलेला त्याला पण येण्याबद्दल काहीच नाही बोलला. ” – विड

 

अनोळखी वाटा – भाग ३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a comment