अनोळखी वाटा – भाग ३

( स्वप्न्या आणि मी )

एका कॉफी शॉप मध्ये आम्ही दोघं भेटलो होतो. इतक्या दिवसांच्या गप्पा बाकी होत्या. जवळपास एक-दीड वर्ष एकमेकांना भेटलो नव्हतो. थोडी स्टाईल किंवा वजन सोडता, आमच्यातली मैत्री आधीसारखीच होती. इतक्या वर्षांनी भेटूनही ‘ आता काय बोलू? ‘ किंवा संभाषण पुढे कसं सुरु ठेऊ, असा प्रश्न निर्माण झाला नाही. सांगायला आणि ऐकायला बरंच काही होतं.

” बोक्या तू यावेळी मला मारवणार आहेस. कुठे जायचं याचा पत्ता नाही. कधी जायचं माहित नाही. फक्त इतकंच माहितेय की गाडी काढून निघायचं. घरच्यांना मी असं सांगू का? एकतर आधीच माहितीयेत ना माझ्या घरचे? ” – स्वप्न्या

” तुझ्या घरचे काय, सगळ्यांच्या घरचे असेच असतात. फरक फक्त इतकाच आहे, माझ्या आईने आपल्या वयाप्रमाणे मला समजून घेतलं आणि संमत्ती दर्शवली. पण तुझ्या घरच्यांना ते नसेल समजत तर तुझंही काम आहे ना, ते समजावून सांगायचं. ” – मी

” अरे हो, एवढी चिडतेस कशाला, थंड घे. ” – स्वप्न्या

” पैशांचा प्रश्न आहे का? ” – मी

” वेडी आहेस का? मला जॉबमधून चांगली सॅलरी मिळते आणि तुला खरं सांगू, मी कुठेच पैसे उधळत नाही. स्वतःवर पण नाही. कमीत कमी गरजेच्या जितक्या वस्तू आहेत, तितकाच आणि तेवढ्यावरच खर्च करतो. ” – स्वप्न्या

” का? ” – मी

” कशावर आणि कशाला खर्च करू? आनंद मिळणार असेल, मला छान वाटणार असेल तर मी खर्च करेन ना! मी ऑफिस, काम आणि घर सोडून काहीच करत नाही. इथे तुमच्याबरोबर मी यायला तयार झालो कारण मला खूप छान वाटतं तुमच्याबरोबर. नेहमीच. ” – स्वप्न्या

” तू मग शनिवार – रविवारी काय करतोस? ” – मी

” ऑफिसचं काम आणि इथे तिथे काहीतरी. ” – स्वप्न्या

” स्वप्न्या, ज्या गोष्टींनी तुला छान वाटतं त्यांच्यासाठी शनिवार रविवार  ठेव ना! ” – मी

” वेळच नसतो गं. एकदा लॅपटॉपसमोर बसलं की दिवस कसा निघून जातो कळत सुद्धा नाही. बरं ते सोड. जमलं तर आपण निदान सुरुवातीचा तरी प्लॅन बनवूया का? तुझ्या डोक्यात नक्की काय आहे? ” – स्वप्न्या

” चल आता बसलोच आहोत, तर बनवूया प्लॅन. पण त्या आधी कॉफी घेऊयात. तसंही तुझ्याशी या बोअरिंग कामाच्या गप्पा मारून माझा घसा सुकलाय. ” – मी

” अच्छा आता बोअरिंग का? बरं…. ” – स्वप्न्या

” जा चल. उधळ आता थोडे पैसे, माझ्यासाठी मस्त कोल्ड कॉफी त्यावर क्रीम घेऊन ये आणि स्वतःसाठी काय हवं ते आणू शकतोस. ” – मी

स्वप्न्या कॉफी आणत होता तोपर्यंत मी स्वतःच्या डोक्यातला प्लॅन कागदावर उतरवत होते.

” बोक्या ही घे तुझी कॉफी. आता चाट. ” – स्वप्न्या

आमच्या बाजूला बसलेलं एक कपल आमच्याकडे बघून हसायला लागलं.

“काढ, सगळीकडे माझी इज्जत काढ.” – मी

“तू तरी बोलू नकोस. तुझे किस्से लोकांना सांगितले ना तर झालंच. शिवाय बोक्या तुझं नाव आहे म्हटल्यावर तू कॉफी चाटणारच ना! कशी ग अशी तू, अडाणी ” – स्वप्न्या

मी फक्त एक तिरकस कटाक्षाने त्याच्याकडे पाहत होते. अजून एक जरी शब्द हा जास्त बोलला असता तर मारच खाणार होता.

“स्वप्न्या लास्ट वॉर्निंग आहे, अजून एक शब्द बोल मग तुझ्या शर्टलाच कशी कॉफी प्यायला लावते बघ.” – मी

(माझ्या बोलण्याला काहीही किंमत न देता सरळ विषय बदलून)

“बरं, दाखव प्लॅन” – स्वप्न्या

“बघ, माझ्या विचाराप्रमाणे साधारण पुढच्या दहा दिवसांनी आपण इथून कार घेऊन निघायचं. कार कोणाला एकालाच चालवावी लागणार नाही कारण आपल्याकडे बरेच चालक आहेत. जसा की तू, विड, कधी कधी फट्टू आणि शेवटी उरले मी. जून महिना आपल्यासाठी योग्य असेल कारण वातावरणात गारवाही असेल आणि पाऊसही म्हणावा तितका जास्त नसेल.” – मी

“कोणकोणती ठिकाणं साधारण तू विचार करतेयस?” – स्वप्न्या

“लोणावळा,कर्जत, भंडारदरा, इगतपुरी, नाशिक, वेल्हा आणि बाकी बघूया. तू सांग” – मी

“आपण नाशिक ला थांबणार आहोतच ना?” – स्वप्न्या

“हो, तुझं विशेष काय काम आहे?” – मी

“सुला….” – स्वप्न्या

“वाह! हे कधीपासून?” – मी

“हल्ली हल्लीच गं, ऑफिसच्या पार्टीजमध्ये” – स्वप्न्या

“मग तर घरी यायलाच पाहिजे, काकूंची परवानगी घ्यायला ट्रीपसाठी” – मी

“बास का! मी केलं का असं कधी काही तुझ्या घरी !” – स्वप्न्या

“तू काय करणार? मी स्वतःच सांगितलंय घरी” – मी

“काय राव, तुझ्यासारखं लाईफ पाहिजे.” – स्वप्न्या

“बरं चल निघू आता. मला उद्या सकाळ-सकाळी रुजूच्या घरी जायचंय.” – मी

“रॅम्बोची परवानगी घ्यायला?” – स्वप्न्या

“हो. बाबा रॅम्बो हो म्हणू दे म्हणजे झालं, नाहीतर तिला घरातून पळवणं खूप कठीण आहे.” – मी

https://wanderingequators.wordpress.com/2018/05/10/%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a4%96%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%be-1/

(Anolakhi Waataa – Bhaag 1)

https://wanderingequators.wordpress.com/2018/06/28/%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a4%96%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%be-2/

(Anolakhi Waataa – Bhaag 2)

One thought on “अनोळखी वाटा – भाग ३

Leave a comment